भटकंती
- Sameer
- Jul 28, 2025
- 3 min read
आपल्या पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी ही केवळ कोण्या परक्या व्यक्तीची किंवा संस्थेची नसते, तर ती संपूर्ण समाजाची सार्वजनिक जबाबदारी आहे. हा विचार निर्माण व्हावा याकरिता ‘Know School मध्ये मुलांसोबत पालकांनीही यावे’ हा आग्रह असतो. दररोज आपल्या पाल्यासोबत Know School मध्ये वेळ घालवणे शक्य नसेल तर दर शनिवारी किंवा रविवारी पालकांनी आपल्या मुलांसोबत येथे उपस्थित रहावे अशी योजना आहे. आपले मूल काय शिकते यापेक्षा आपले मूल कसे शिकते हे समजून घेण्याचा हा सहज आणि सोपा मार्ग आहे. शनिवारी किंवा रविवारी पालक Know School मध्ये आलेत की आम्ही त्यांच्यासोबत गप्पा करतो आणि त्यातून पालकांना आणि आम्हालाही मुलांबाद्दल अधिक शिकता येते.
अशाच एका रविवारी Know School मध्ये पालकांची हजेरी झाली. परंतु आज केवळ गप्पा न करता पालक आणि मुले यांच्यासोबत मिळून एक खेळवजा कृती करावी अशी योजना आखली गेली. पालकांना एका कागदावर भटकंतीचा एक नकाशा देण्यात आला. Know School येथून निघून काही दूर अंतरावर जाऊन परत येण्याची ती कृती होती. सर्व पालक आपापल्या मुलांना घेऊन निघाले. काही मुलांचे पालक येऊ शकले नाहीत तर काही पालकांची मुले अनुपस्थित होती. अश्यात काही आई बाबांनी इतर मुलांचे तात्पुरते पालकत्व घेतले आणि काही मुलांनी इतर पालकांचा हात धरून हा फेरफटका मारायचा अशी सहमती दिली. बाहेर ऊन होते तर काहींनी ही भटकंती पाई न चालता गाडीने करावी असे ठरवले.

काही पालक चालत चालत भटकंतीवर निघालेत. गाडीने जावे की चालत जावे असा कोणताच नियम वा आट यात नव्हती हा पालकांचा निर्णय होता. केवळ भटकंती चा एक नकाशा दिलेला होता ज्यावर त्या मार्गावरील दुकानं, मंदिर, इमारती, किंवा विशेष जागांचा उल्लेख केलेला होता. आपल्या मुलांसोबत ही सैर करीत असताना गप्पा माराव्या केवळ हे सुचविले होते. परत आल्यावर पालकांना ह्या भटकंती दरम्यान त्यांच्यात कोणत्या आणि काय गप्पा झाल्यात किंवा त्यांना काय अनुभव आलेत यावर चर्चा करण्यात आली. अर्थात परत आल्यावर अशी चर्चा करायची आहे, याची कल्पना पालकांनी दिलेली नव्हती.
भटकंती दरम्यान तुम्ही काय पाहिलंत? आपल्या मुलांसोबत काय गप्पा झाल्यात? आणि तुम्हाला एकूणच काय अनुभव आला? असे काही प्रश्न विचारून चर्चेची सुरवात झाली. यातील एक पालक ज्यांचा पाल्य सोबत येऊ न शकल्याने ते Know School मधील कुठल्याशा वेगळ्याच मुलासोबत या सफरीवर गेले होते त्यांचा अनुभव आम्हा सगळ्यांना खूप काही शिकवून गेला.
बाहेर ऊन असल्याने गाडीने फिरून यावे असे वाटले होते, परंतु चालत गेल्याने गप्पा करायला जास्त वेळ मिळाला असे त्यांनी सांगितले. आणि पायी चालत गेल्याने हवे तिथे सहज थांबता आले. नकाश्यावर दिलेल्या स्थळांना जवळून अनुभवता आले. आणि त्याहीपेक्षा नकाशावर दिलेल्या स्थळांच्या व्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टी पाहता आल्या, जाणून घेता आल्या आणि त्यावर मनमुराद गप्पाही झाल्या. दिलेल्या नकाशात झाडांचा, फुलाफळांचा, प्राण्यांचा, व्यक्तींचा किंवा दगड गोट्यांचा किंबहुना आकाशातील पक्ष्यांचा आणि आभाळातील ढगांचा, परिसरातील अशा अनेक घटकांचा कुठलाच उल्लेख नव्हता. चालत गेल्याने या सगळ्या गोष्टींवर नजर गेली, त्यावर चर्चा झाली. एकमेकांना आपले विचार, आपले मत आणि आपल्याजवळ असलेली माहिती देता घेता आली. आणि यामुळे मला माझ्या सोबत असलेल्या मुलातील निरीक्षणशक्तीच्या गुणांचा परिचय झाला. त्याने मला अनेक प्रश्न विचारलेत आणि त्याच्याकडून मला अनेक गोष्टींचे महत्त्व आणि त्यांचे अस्तित्व जाणवले. रस्त्यावर मरून पडलेलं फुलपाखरू हातात घेता आलं. आणि फुलपाखराच्या पंखावरील रंग अलगद हाताला चिकटतात हे आम्हाला कळलं. या भटकंती मुळे मला माझ्यासोबत आलेल्या मुलाबद्दल खूप काही शिकता आले.
Know School मधल्या ह्या कृतीमध्ये पालकांना नकाशा पुरविणे ही योजना म्हणजे शाळेत जसे पाठ्यपुस्तक असते तशीच होती. तो एक ‘सापळा’ होता. या सापळ्यात आपण मोठी माणसं अगदी सहज अडकतो. कारण आपल्याला तशी सवयच झालेली असते. ही सवय आपल्याला शाळेनं घालून दिलेली आहे. काय शिकावं, कसं शिकावं आणि का शिकावं. हे सगळं आधीच ठरलेलं असतं.

कधी कधी आपण आपल्या कामातून वेळ काढून आपल्या मुलांसोबत फिरायला जातो परंतु, कुठे जायचे हे आधीच ठरवलेले असते. काय अनुभव घ्यायचा हे देखील पक्के असते, किंबहुना तोच तोच अनुभव घेतल्या जातो. नवे काही पाहता येत नाही किंवा जाणून घेता येत नाही. गंतव्य स्थान ठरले असल्याने भटकंतीच्या दरम्यान गप्पाही त्याच होतात किंवा होतच नाही. झटपट आणि आरामदायक प्रवास व्हावा याकरिता चालत जाणे या ऐवजी गाडीने फिरून येण्यावर आपला भर असतो. ठरलेल्या स्थळांना भेटी देत असताना तिथला अनुभव घेण्याऐवजी कॅमेरात तिथल्या केवळ आठवणी टिपण्यात आपण गर्क होतो. जीवन जगताना आपले लक्ष साधण्याच्या ध्यासापोटी अनेक गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही, अशा गंभीर विचारावर त्या रविवारी भटकंती च्या त्या कृतीने Know School मध्ये चर्चा झाली. आणि मुलं काय शिकते यापेक्षा ते कसे शिकते हे समजून घेता आले.
नकाशा पुरविणे ही क्लुप्ती केवळ या गंभीर विचारावर येऊन पोचण्याकरिता होती.
Comments