top of page
Search

व्यक्त होणारा व्यवहार

  • Writer: Jyoti
    Jyoti
  • Jul 12
  • 3 min read

Know School चे काही सदस्य, म्हणजे पालक आणि त्यांच्या सोबत शाल्मली आणि आयुषी या त्यांच्या मुली, कोईम्बतूर येथे एका शिबिरात गेल्या होत्या. पाच दिवसांचे हे शिबीर लर्निंग सोसायटी नावाच्या एका मोठ्या संस्थेने आयोजित केले होते. लर्निंग सोसायटी ही अनौपचारिक पद्धतीची अशी एक संस्था आहे. संस्था काय हा केवळ समविचारी लोकांचा समुदाय आहे असे म्हंटले तर योग्य. लर्निंग सोसायटी नियमाने भारतभरात असे शिबीर आयोजित करीत असते. LSUC म्हणजे, लर्निंग सोसायटी अनकॉन्फरन्स या नावाने, लर्निंग सोसायटीच्या शिबिरात एक अनौपचारिक परिषद भरवली जाते.


या परिषदेत शिक्षण म्हणजे नेमके काय? आणि ते कसे असायला हवे या विषयावर विचार निर्मिती करणे आणि त्याचा प्रसार प्रचार करणे हा मुख्य हेतू असतो. येथे सहभागी होणारे सर्व लोक शिक्षण या विषयावर निरनिराळे प्रयोग करणारे असे असतात. जीवन शिक्षण यावर सातत्याने काम करून आपल्या कामाचा परिचय इतरांना व्हावा आणि इतरांच्या नव्या विचारांना समजून घेण्याच्या मुख्य उद्देशाने यात लोक सहभागी होत असतात. या वर्षी च्या शिबिराला Know School च्या वतीने सपना, ज्योती, आयुषी आणि शाल्मली यांनी हजेरी लावण्याचे ठरवले. नोंदणी झाली, प्रवासाची तिकिटे काढलीत आणि Know School बद्दल लोकांना सांगावे आणि इतरांकडून काही नव्या कल्पना घ्याव्या आणि नवीन गोष्टी शिकाव्या अशी तयारी सुरु झाली. या परिषदेचा एक गमतीदार भाग म्हणजे तेथे होणारा एक मेळावा. या मेळाव्यात ज्यांना आपल्या नव्या विचारांचे, कल्पनांचे किंवा जीवनोपयोगी, शिक्षणोपयोगी उत्पादनांची माहिती किंवा विक्री करण्याची इच्छा असेल त्यांना स्टॉल पुरविल्या जातात. माहितीची किंवा वस्तूंची देवाण घेवाण आणि क्रय विक्रय याचा व्यवहार यात होत असतो.

ree
ree

आयुषी आणि शाल्मली यांनीही तेथे एक स्टॉल लावण्याची तयारी केली. स्टॉलवर बुकमार्क ठेवावे, त्यांची विक्री करावी अशी योजना होती. त्या करिता त्यांनीच स्वतःच्या हाताने ही बुकमार्क बनवायला घेतली. चित्र, एका वाक्यात गमतीदार गोष्टी, घोषवाक्य तर कुठे सुविचार असा काही मजकूर कागदाच्या पट्टीवर लिहून त्याला सजवून काही बुकमार्क तयार झालेत. मग एका बुकमार्कची किंमत किती यावर विचार सुरु झाला. पण Know School ने हा व्यवहार जरा निराळ्या पद्धतीने करण्याचे ठरविले. आयुषी आणि शाल्मली यांच्यासोबत चर्चा करून एकमताने एक भन्नाट निर्णय घेण्यात आला.


शिबिरात गेल्यानंतर ज्या दिवशी स्टॉल लावल्या गेला त्या दिवशी Know School च्या स्टॉलवर एक पाटी लावण्यात आली. त्यावर लिहिले होते. “हे सुंदर बुकमार्क विकत घ्यायचे असल्यास आम्हाला तुम्ही जोक सांगा, नाचून दाखवा, गाणी गा, किंवा बोला. तुमच्या आवडीचा बुकमार्क प्राप्त करा” बस मग काय स्टॉल वर भेट देणाऱ्या प्रत्येकाने आयुषी आणि शाल्मली यांचे बुकमार्क प्राप्त केलेत. कुणी मल्याळम भाषेतील गाणी गायली, कोणी गप्पा केल्या, कोणी गोष्ट सांगून गेले, कुणी नाचलेत तर कुणी जोक सांगून हसवून गेलेत.

ree

ज्याला जसे जमेल त्या माध्यमाने ते गिऱ्हाईक व्यक्त होत गेलेत आणि हा अनोखा व्यवहार करून बुकमार्क घेऊन गेलेत. व्यवहाराची ही अभिनव कल्पना लोकांना इतकी भावली की तासाभरातच बनवून नेलेले सगळे बुकमार्क खल्लास झालेत. परंतु बुकमार्क तयार करण्याचं साहित्य शिल्लक होतें. मग ऑफर बदलली. आता, “ग्राहकाने आमचे मनोरंजन करावे आणि बुकमार्क तयार करण्याचा स्वतः अनुभव घ्यावा” असे ठरले. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. काहींनी तर गाऊन, नाचून, गप्पागोष्टी करून मग स्वतःच बुकमार्क तयार केलेत. या अभिनव पद्धतीच्या व्यवहाराकरीता आयुषी आणि शाल्मली यांचे कौतुक म्हणून स्वतः तयार केलेले बुकमार्क यांना भेट म्हणून देऊन गेलेत. व्यक्त होण्याची संधी देणारा हा व्यवहार खरोखरीच घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांनाही आनंद देऊन गेला.


व्यवहार हा केवळ पैशांचाच असतो हेच आपण मान्य करून बसलो आहोत. व्यवहाराकरिता चलन अस्तित्वात किंवा वापरात येण्याआधी वस्तू विनिमयाची (बार्टर) पद्धत होती. त्या पद्धतीतही सहभावना टिकून होती.

ree

त्यातही व्यक्त होण्याला जागा तरी होती. चलनाच्या पद्धतीने व्यवहार हा चोख होतो परंतु त्यात माणसाचे मन, भावना आणि मुख्य म्हणजे माणूसपण आपण हरवून बसलो आहे. आज तर आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमाने ज्यांच्यासोबत व्यवहार करतो आहे त्यांच्यासोबत साधे बोलणेदेखील होत नाही. ऑनलाईन पद्धतीने आपण व्यवहार करतो.

ree


अगदी रोजच्या जीवनावश्यक वस्तू ह्या मोबाईलवरून ऑर्डर देऊन थेट घरी येतात. विक्री करणारा दुकानदार किंवा विक्रेता कोण? कसा? कुठला? काहीही जाणून घेण्याची गरज नाही. आपल्याला व्यवहारात ही सोय झाली आहे असे असले तरीही व्यवहारातून व्यक्तीपर्यंत पोचता येत नसल्याने असा व्यवहार आपल्याला मोबदला देतो परंतु आनंद आणि समाधान देत नाही. भाजी विकणाऱ्या मावशीला दोन रुपये कमी कर म्हणताना, “काय मावशी गेल्या आठवड्यात दुकान बंद का होतं?” असा प्रश्न करण्याची सोय होती. त्यावर ती भाजीवाली मावशी “काय सांगू साहेब, माझ्या नातीच लग्न होतं घरी, घ्या ही कोथिंबिरीची काडी फुकट” असा व्यवहार करून आपला आनंद व्यक्त करीत असे.

Know School ने आयुषी आणि शाल्मली याना अशाच व्यक्त होणाऱ्या व्यवहाराचा अनुभव दिला आणि ग्राहकांनी व्यक्त होत तो व्यवहार केला.

ree

 
 
 

Comments


bottom of page