निर्भय, फुगा आणि अडीच तास..


गेल्या दोन महिन्यांपासून (Know school) क्नो स्कुल ची सुरवात झाली. आम्ही या जागेला जरी क्नो स्कुल म्हणत असलो तरी मुलांना ही जागा अगदी घरासारखीच वाटते. कारण येथे बसायला सोफा आहे, मनसोक्त लोळायला पलंग आहे. पुस्तके आहेत पण ती शालेय शिक्षणाची नाहीत तर कवितांची, गोष्टींची, चित्रांची आहेत. येथे फळा नाही, वर्गखोल्या नाही. शिक्षक नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणवेश नाही. येथे येणारी लहान मुले आणि त्यांनी सहज खेळतांना मिळालेले शिक्षण समजून घेणे हा एक विलक्षण अनुभव असतो.
अगदी परवाचीच गोष्ट आहे. साडे तीन वर्षांचा निर्भय क्नो स्कुल मध्ये आला. त्याला आल्या आल्याच टम्म फुगलेला एक फुगा मिळाला. निर्भय, फुगा खेळण्यात दंग झालेला होता. कधी सोबत आलेल्या आजीला त्याच्या खेळात त्याने ओढले तर कधी जो समोर येईल त्याला गोवले. निर्भय हा नावा सारखाच निर्भय आहे. फुग्यासोबत त्याचा चाललेला खेळ निर्भयपणे निरंतर सुरु होता. मार्च महिना म्हणजे उकाडा. कुलर नुकताच लावला होता. त्याचा थंड वरा अंगावर घेण्यासाठी निर्भय हातात फुगा घेऊन, कुलर समोरच्या पलंगावर चढला आणि त्याच्या हातुन फुगा सुटला. एक घटना घडली. त्यानंतर पुढील अडीच तास निर्भयचा त्या घटनेला समजून घेण्याचा अभ्यास सुरु झाला.
“शाळेत मिळालेला गृहपाठ अगोदर उरकून घे आणि मग जा खेळायला.” मुलांना अशा सूचना सतत केल्या जातात. परंतु शाळेचा अभ्यास आणि खेळ यात तुलना करून खेळाला अगदी दुय्य्म दर्जा दिला जातो. प्राथमिकता असते ती शाळेच्या अभ्यासाला. मुळात अभ्यास या क्रियेबद्दलच आपल्याला मोठा संभ्रम आहे. ‘अभ्यास’ म्हणजे शाळेतील शिकवलेल्या गोष्टी वारंवार करणे आणि शिकवलेल्या गोष्टीत प्राविण्य मिळवणे म्हणजे अभ्यास असाच अर्थ आपल्याला शिकवल्या गेला आहे. मुळात आपल्या अवती-भवती घडत असलेल्या घटनेचे उत्सुकते पोटी आपले अवलोकन होत जाते. ती सहज घडलेली घटना का? आणि कशी घडली हा प्रश्न मनात येतो. या प्रश्नाचे उत्तर शोधायची शोधवृत्ती ती घटना वारंवार घडवण्याची आणि अनुभवण्याची उर्मी निर्माण करते. वारंवार तेच केल्याने प्रत्येक वेळी नवा अनुभव येतो, तो मनात नोंदवला जातो. आणि अशा अनेक अनुभवांची अनुभूती म्हणजेच त्या घटनेला समजून घेण्यासाठी आणि त्यातून मिळालेल्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होण्यासाठी महत्वाची असते. या संपूर्ण प्रकियेला आपण खेळ म्हणतो. मुळात त्या घटने मागील कार्यकारण भाव समजून घेण्याची धडपड म्हणजेच खेळ आणि त्या घटनेचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी, त्याचा वारंवार अनुभव घेण्यासाठी केलेली किंबहुना सहज रित्या केलेली कृती म्हणजे अभ्यास. अभ्यास हा ठरवून केल्या जात नाही. मुळात काय शिकावे हे आधीच ठरले असेल तर, त्यात उत्सुकता उरत नाही. शोधण्यासारखे काहीच नसते. वारंवार करायला सांगितलेल्या कृतीतुन मिळणाऱ्या अनुभवात नावीन्य नसते. वारंवार एकच अनुभव मिळाल्याने प्राविण्य मिळते पण ते केवळ माहिती संकलनाचे असते. काय शिकायचे हे ठरवून दिलेला आणि ठरवून केलेला अभ्यास ज्ञान निर्माण करु शकत नाही. अभ्यास म्हणजे सहज खेळताना किंवा न ठरवता केलेल्या कृतीतून घडलेल्या घटनांचे निरीक्षण, उत्सुकतेपोटी त्या घटनेची केलेली पुनरावृत्ती, त्याचे विश्लेषण, त्यामागचा गंभीर विचार, विज्ञान, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदनिर्मिती.
निर्भय हे सगळे शिक्षणाचे टप्पे पार करत, सहजपणाने खेळत शिकत होता. हातुन फुगा सुटला. कुलरच्या वाऱ्याने तो फुगा गोल गोल फिरू लागला आणि एक असीम आनंद निर्भयचा चेहऱ्यावर दिसला. दर थोड्या वेळाने त्याने विविध जागांवर चढुन, उतरून, लांबुन तर कधी जवळुन विविध ठिकाणांवरून वेगवेगळ्या प्रकारांनी तो फुगा कुलरच्या वाऱ्याचा प्रवाहात सोडला. आणि मनापासून खळाळून हसला. त्याला लागलेला हा शोध त्याने प्रत्येकाला सांगीतला. निर्भयकडे पाहून त्याची मैत्रीण शंभवी म्हणाली, “क्नो स्कुल ची गंमत शाळा झाली”. आम्ही सगळेच निर्भयकडे कौतुकाने बघत होतो, आणि निर्भय, निर्भयपणे शिकत होता.
Comments